जरांगे होणार शिवचरणी नतमस्तक

| रायगड | खास प्रतिनिधी |

मनोज जरांगे-पाटील हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी (दि.29) रायगड किल्ल्यावर मुक्काम करणार आहेत. मंगळवारी (दि.30) ते शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारले होते. मुंबईतील आझाद मैदानात शुक्रवारी (दि.26) ते बेमुदत उपोषणाला बसणार होते. या कालावाधीत त्यांच्यासोबत सुमारे तीन कोटींहून अधिक समर्थक मुंबईत येणार होते. जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकारला झुकावे लागले होते. शनिवारी (दि.27) पहाटे तीन वाजता सरकारने मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी केली. नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रस पीत जरांगेंनी त्यांचे आंदोलन स्थगित केले होते.

मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी करताना सगेसोयऱ्यांचा मुद्दा समाविष्ट केल्याने जरांगेंनी लढाई जिंकल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा रायगडवर दाखल होणार आहेत. त्यानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, खोपोली, पेण, अलिबाग, रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, महाड, पोलादपूर तालुक्यातील जरांगे समर्थक मोठ्या संख्येने जरांगेंच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे.

जरांगे रायगडात येत असल्याने महाड तसेच रायगड किल्ला परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Exit mobile version