पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवण्याचा इशारा
। जालना । वृत्तसंस्था ।
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु होते. परंतु, अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरांगे यांच्या वक्तव्याचा सुरु झालेला निषेध या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तूर्तास दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची रणनीती नव्याने ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सोमवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस मी उपचार घेईन. त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन. संचारबंदीमुळे मराठा बांधवांना इकडे येणे शक्य नाही. त्यामुळे लोक सैरभैर झालेत. मी सुखरुप आहे. मला कोणीही कुठेही नेलेले नाही. तोपर्यंत मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवावे. बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे. त्यामुळे अफवा पसरत आहेत, त्या पसरुन देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. सरकारने नाराजीची लाट ओढवू नये. जनतेला वेठीत धरू नये, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
मराठा बांधवांच्या विनंतीनुसार, मी आमरण उपोषण स्थगित करत आहे. त्याचे उपोषण साखळी उपोषणात करत आहे. मी आता गावागावत जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला इतरांना भेटण्याचा मूलभूत अधिकार आहे. मी तुमच्याकडे येत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यांची जीभ घसरल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे म्हटले होते. ते मुंबईच्या दिशेने निघालेही होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांची धरपकड करत संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला होता. ते पुन्हा अंतरवाली सराटीला पोहोचले होते.