। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील वृत्तपत्र विक्रेते बाळकृष्ण लालजी मेथा यांचे सोमवार (दि.26) सायंकाळी सव्वासहा वाजता राहत्या घरी सिद्धीनगर माणगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमई त्यांचे वय 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी 1 मुलगा, 3 मुली, सून, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मेथा कुटुंबियांवर तसेच माणगावात शोककला पसरली आहे.
बाळकृष्ण मेथा यांनी माणगावात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सन 1968 पासून सुरू केला. पहाटे लवकर उठून वाचकांना वृत्तपत्र वाचायला मिळावे यासाठी त्यांची विशेष मेहनत होती. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी तासनतास आपल्या वृतपत्राच्या दुकानात उभे राहून काम केले. त्यांना याकामी त्यांची पत्नी तसेच मुलगा नितीन, सून वर्षा यांनीही चांगली साथ दिली. त्यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय पुढे त्यांचा मुलगा नितीन व सून वर्षा हे चांगल्या प्रकारे चालवीत आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व सर्वांना आपलेसे करून सर्वांची आस्थेने विचारपूस करणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणून बाळकृष्ण मेथा यांचाकडे पाहिले जात होते. वर्षभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मंगळवारी (दि.27) माणगाव येथील स्मशानभूमीत सकाळी साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.