। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय फुटबॉल संघाला फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेच्या तिसर्या पात्र फेरीत पोहचण्यात अपयश आले होते. त्यानंतर प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हाकालपट्टी करण्यात आली होती. आता यानंतर महिन्याभरातच भारताच्या पुरुष फुटबॉल संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या स्पेनच्या मानोलो मार्केझ यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचेही मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. स्टिमॅक यांची हाकालपट्टी केल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीची शनिवारी बैठक झाली आणि त्यात मार्केझ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2024-25 या मोसमासाठी मार्केझ एफसी गोवा, तसेच भारतीय संघ या दोन्ही जबाबदार्या सांभाळतील. त्यानंतर ते केवळ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. मार्केझ यांची नियुक्ती करताना त्यांच्या प्रशिक्षपदाचा कालावधी किती असेल, हे मात्र फेडरेशनने स्पष्ट केले नाही.