गावासाठी स्वतंत्र लसीकरणा केंद्र व्हावे : सरपंच चेतन जावसेन
कोर्लई | राजीव नेवासेकर |
कोरोना रोगाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यात सर्वत्र लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणात ढिसाळ कारभाराबाबत पंचक्रोशीतील अनेक नागरिक आजही लसीकरणापासून वंचित असून गावासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र व्हावे.अशी मागणी सरपंच चेतन जावसेन यांनी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
बोर्ली मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत लसीकरणात सुरुवातीला लस वाटपात गौडबंगाल होत असल्याचे समोर आले आहे.लस घेणा-यांची यादी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मोबाईल/फोन द्वारे आधीच तयार करण्यात येत होती.त्यामुळे बोर्ली गावातील लसीकरण अत्यंत कमी प्रमाणात झाले असल्याचा प्रकार सरपंच चेतन जावसेन व सदस्य गणेश कट यांनी उघडकीस आणला होता.त्यानंतर ते नागरिकांना लसीकरणाबाबत सोशल मीडिया व फोन द्वारे माहिती देण्यात प्रयत्नशील व लसीकरणासाठी नावनोंदणी वर लक्ष ठेवून होते.
बोर्ली मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.५ ऑगस्ट रोजी लस उपलब्ध झाली.परंतु याची कोणतीही माहिती सरपंच चेतन जावसेन यांना देण्यात आली नाही.त्यामुळे लसीकरण सुरू झाल्याची माहिती गावातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकली नाही.मात्र लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेरून आलेल्या लोकांची गर्दी दिसून आली.याचाच अर्थ गावातील लोकांना लसीकरणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जाते काय ? असा सवाल उठत आहे.
सद्यस्थितीत, गेल्या महिनाभरापासून बोर्ली ग्रामपंचायत हद्दीत एकही कोविड रुग्ण आढळून आला नाही व पुढील काळात कोरोना महामारी हद्दपार करण्यासाठी सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, सदस्य प्रयत्नशील आहेत.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त होत असून चौकशीची मागणी केली जात असून गावातील लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र व्हावे.अशी मागणी चेतन जावसेन यांनी केली आहे.






