। रोहा । प्रतिनिधी ।
कंपनीत गाडी भाड्याने लावून दर महिन्याला चांगली व दामदुप्पट रक्कम मिळवून देतो असे सांगून. सदर गाडी तिऱ्हाईत व्यक्तीकडे गहाण ठेऊन अनेक गाडी मालकांना चुना लावणाऱ्या भामट्या तरुणा विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असताना त्याला 3 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे वाहनधारकांत खळबळ उडाली असून या प्रकरणात जिल्ह्यातील अनेक वाहन मालकांची फसवणूक झाल्याची चर्चा होत आहे.
रोहे शहारातील अष्टमी गावातील उमेर अब्दुल लतीफ कडू (26) असे आरोपी तरुणाचे नाव असून, तुमची गाडी नागोठणे जवळील एका कंपनीत भाड्याने लावून देतो. या माध्यमातून तुम्हाला भाड्यापोटी चांगली रक्कम मिळेल. व तुमच्या गाडीवर असलेला बँकेच्या कर्जाच्या हफ्त्यांची रक्कम परतफेड करता येईल व तुमचा व्यवसाय देखील होईल असे सांगून. रोहा खालचा मोहल्ला येथील तक्रारदार इलियास इरफान बडे या तरुणाच्या मालकी इर्टिगा गाडी व वॅगनर गाडी या दोन्ही गाड्या भाडेतत्वावर घेतल्या. गाड्या आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आरोपी तरुण उमेर कडू याने मूळ गाडी मालकाला अंधारात ठेऊन व ठरलेला करारनामा भंग करुन सदर गाड्या परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीकडे गहाण ठेऊन गाडी मालकाचा विश्वासघात केला. भाडेतत्वावर दिलेल्या आपल्या गाडीची रक्कम उमेर कडू देत नसल्याने व वारंवार खोटे आश्वासन देत असल्याने व आपली गाडी गहाण असल्याची माहिती समजताच तक्रारदार इलियास बडे याने पोलिसांत धाव घेतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. या घटनेत अनेक बडे वाहन मालकांना चुना लावून बक्कल रक्कम वसूल केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.त्यामुळे साऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बाबत रोहा पोलीस ठाण्यात आरोपी उमेर कडू विरोधात गुन्हा दाखल असून, सहा. पोलीस अधीक्षक सूयश कुमार सिंहा यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक संदीप फड अधिक तपास करित आहेत.
गाड्या भाड्याने देतो सांगून अनेकांना गंडा
