| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात अवैध दारू व्यवसायाला रोखण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार धडक कारवाई करत गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळाची मोठी खेप पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 लाख 89 हजार 600 रुपये किंमतीचा अवैध माल जप्त केला असून, दारू माफियांना अक्षरशः हादरा बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा-चणेरा मार्गावरील खारी चेक पोस्ट येथे पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाची बोलेरा (एमएच-42-बीएफ-7392) गाडी थांबवली. या गाडीची तपासणी केली असता त्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ सापडला. रोहा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडीसह काळा गुळ ताब्यात घेतला. या कारवाईत संजय म्हात्रे (23) आणि काशिनाथ रामा लांभोरे (26) या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी जप्त केलेल्या मालामध्ये 89 हजार 600 रुपये किंमतीचा काळा गूळ (350 ढेप, प्रत्येकी 8 किलो वजन, प्रति ढेप 256 रुपये) तसेच, 6 लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण 6 लाख 89 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रोहा पोलिसांच्या या दमदार आणि अचूक कारवाईमुळे गावठी दारूच्या अवैध धंद्यांना मोठा झटका बसला आहे. नागरिकांकडून या कारवाईचे भरभरून कौतुक होत असून, ‘दारू माफियांना रोहा पोलिसांची चपराक’ असेच सर्वत्र बोलले जात आहे.







