| सुतारवाडी | प्रतिनिधी |
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत एकूण 6 उपकेंद्रे आहेत. त्यातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत आहे. आरोग्य खात्यात रिक्त असलेली पदे न भरल्यामुळे नागरिकांना दररोज अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत असलेल्या 6 उपकेंद्रापैकी कुडली, सुतारवाडी व घाटाव याठिकाणी प्रत्येकी एक-एक आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. तसेच, सुतारवाडी, तळवळी, संभे व घाटाव या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. तर पहूर, देवकाने, भुवनेश्वर ही उपकेंद्र नव्याने बांधण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवक व आरोग्य सेविका ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडत असतो. आंबेवाडी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 51 गावे असून एकूण लोकसंख्या 59,962 एवढी आहे. आरोग्याच्या नवनवीन योजना सातत्याने राबविल्या जातात. त्या सुरळीतपणे राबविण्यासाठी मनुष्यबळ ही तितकेच आवश्यक असते. मात्र, आरोग्य खात्यात रिक्त असलेली पदे न भरल्यामुळे दररोज अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. सुतारवाडी येथे पूर्वी पूर्णवेळ परिचारिका कार्यरत होती; मात्र, काही दिवसांपूर्वी तिची इतरत्र बदली झाल्यामुळे तेथे परिचारिकेची जागा रिक्त आहे. या उपकेंद्रामध्ये प्रस्तुतीसाठी अनेक ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, आदिवासी भगिनी येत असतात. तसेच, विविध प्रकारचे डोस, अनेक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम येथील कर्मचारी वर्ग सातत्याने करत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत विविध उपकेंद्रातील विविध रिक्त जागा लवकरात लवकर भरून मिळाव्यात, अशी परिसरातील हजारो नागरिकांची मागणी आहे.







