अलिबागमधील अनेक कार्यकर्ते शेकापमध्ये

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग कोळीवाडा व श्रीबागमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला रामराम करीत शेतकरी कामगार पक्षात गुरुवारी (दि. 7) प्रवेश केला. शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन हा पक्षप्रवेश सोहळा अलिबागमधील शेकाप भवनमधील सभागृहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी सदस्य संजय पाटील, कैलास गजने, विजय ठाकूर आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे गटातील आमदारांसह तेथील पदाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अलिबाग कोळीवाडा व श्रीबाग येथील कार्यकर्त्यांनी गजने ग्रुपतर्फे शेतकरी कामगार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. शेकापच विकास करू शकतो. हा विश्‍वास मनात घेऊन सर्व कार्यकर्ते शेकापमध्ये सामील झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे गटातील कार्यकर्ते शेकापमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यामुळे शेकापचे बळ वाढू लागले असल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

यावेळी हरेश सावंत, कपिल पवार, कमलेश राठोड, अनिल जाधव, विनोद पवार, अनिल पवार, आशा राठोड, ओंकार राठोड, हर्षल राठोड, मंगेश पवार, सुमीत सिंग, वैभव खोत, विशाल मोरे, गणेश खोत, विवेक खोत, संकल्प मयेकर, वेदांत खोत, कुणाल गिरी, निखिल हाडकर, रौनक बना, सुधीर पाटील, मनोज पाटील, जितू जाधव, चेतन जाधव, गणेश पाटी, अंकुश मोरे आदींसह अन्य कार्यकर्ते, तरुणांनी गजने ग्रुपतर्फे शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Exit mobile version