मराठा आंदोलक अजूनही संतप्त; पोलिस अधीक्षकांवर कारवाई

बुलढाण्यातील कार्यक्रमाला पवार, फडणवीस गैरहजर

| मुंबई | प्रतिनिधी |

मराठा आरक्षण आंदोलकांवर जालन्यात झालेल्या निर्घृण लाठीहल्ल्याचे पडसाद रविवारीदेखील संपूर्ण राज्यात उमटले. मराठवाड्याच्या अनेक भागात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या व जाळपोळीच्या घटना घडल्या. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र असून लाठीहल्ला कोणाच्या आदेशाने झाला याचा ठोस खुलासा अजूनही करण्यात आलेला नाही. त्यातच, रविवारी बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. या प्रकरणी जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून उच्चस्तरीय चौकशी होईल याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी बेछूट लाठीहल्ला करण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही राज्याच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे स्वराज्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष विकास जाधव याने स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादेत एका तरुणाने कार पेटवली. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे मराठवाडा विभागातील एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून विदर्भात जाणाऱ्या गाड्यांही रोखून ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षणाची प्रक्रिया चालू- शिंदे
दरम्यान, लाठीहल्ल्याच्या घटनेमुळे मलाही दु:ख झालं असून 'ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर रविवारी टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मी मुख्यमंत्री झाल्यावर वादात अडकलेल्या साडेतीन हजार मराठा तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. लाठीहल्ल्याच्या प्रकरणात जालन्याच्या पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायालयीन चौकशीही करू, अशी घोषणाही शिंदे यांनी येथे केली.
पवार, फडणवीस गैरहजर
दरम्यान, बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, फडणवीस हे लडाखमध्ये गेले आहेत आणि अजित पवारांची तब्येत बरी नाही. त्यामुळे दोघांनाही यायला जमणार नाही. पण काहीही झालं तरी आमचं सरकार घट्ट आहे. बुलढाण्यात आज रविवारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत पार पडलेल्या शासन आपल्या दारी या शासकीय सोहळ्याच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर विखारी टीका केली. यामुळे या शासकीय सोहळ्याला राजकीय सोहळ्याचे किंबहुना एखाद्या जहाल प्रचार सभेचे स्वरूप प्राप्त झाले.
शत्रूवरच्या सारखा हल्ला- आदित्य ठाकरे
आदित्‍य ठाकरे म्हणाले, जालन्यात जी घटना घडली, ती आपण सर्वांनी पाहिली आहे. हा भयानक लाठीमार होता. एखाद्या शत्रूवर हल्ला करावा, अशाप्रकारे लाठीमार करायला लावला आहे. मी दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. एवढं संवेदनशील आंदोलन होत असताना, मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीमार करतील, हे अशक्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना 100 टक्के हे माहीत असणार. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. लाज असेल तर राजीनामा देतील.
पोलिस अधीक्षकांवर कारवाई
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली असून शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनीही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालन्यातील सुमारे दोनशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. अंबड चौफुली भागात एक ट्रक जाळून चालक असलेला फिर्यादी आणि क्लिनरला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version