। धाटाव । वार्ताहर ।
सरकारी दप्तरात नोंदी तपासून समाज बांधवांना तातडीने दाखले देणे, आजगायत कुणबी मराठा किती नोंद सापडल्या किती दाखल्यांचे वाटप करण्यात आले, प्रक्रियेत अडथळे काय? याबाबत महत्त्वाची चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेतली.
मुख्यतः तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या दाखल्यांना विलंब होत आहे. दाखल्यांसाठी विद्यार्थी त्यांचे पालक दररोज पायपीट करत आहेत. मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दाखले वेळेत मिळत नाहीत अशा प्रचंड तक्रारी समोर आल्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी नेमकी अडवणूक कुठे होते? याही महत्त्वाच्या विषयांवर तहसीलदार देशमुख यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती तहसीलदार किशोर देशमुख यांनी शालेय विविध दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत जलद सुरू आहे. उर्वरीत प्रलंबित दाखले तात्काळ दिले जातील, असे ठोस आश्वासन तहसीलदार किशोर देशमुख यांनी समाज शिष्टमंडळाला दिले.
यावेळी अध्यक्ष अप्पा देशमुख, उपाध्यक्ष नितीन परब, संदीप सावंत, निलेश शिर्के, राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख, राजेश काफरे उपस्थित होते.