सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणीही योगेश केदार यांनी केली आहे.

तसेच ‘मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. तुमचं सरकार आलं म्हणून आम्ही आंदोलनं सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नका. तुमचं सरकार आलं म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, अशा शब्दात योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांना सुनावलं आहे.

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप तानाजी सावंत केला आहे.

Exit mobile version