पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील नवोदित अभिनेत्रीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिची दुर्दैवी अखेर झाली. गोव्यात फिरायला गेलेल्या पुणेकर तरुणी आणि तिच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील अरपोरा भागातील खाडीत कार कोसळून सोमवारी सकाळी त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये पुण्याची रहिवासी असलेली 25 वर्षीय अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा 28 वर्षीय मित्र शुभम देडगे यांचा करुण अंत झाला.
गोव्यात बारडेझ तालुक्यातील अरपोरा म्हणजेच हाडफाडे गावाजवळ सोमवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने येणार्या रस्त्यावर गेली आणि तिथून खाडीत पडली. गाडी सेंट्रल लॉक झाल्यामुळे दोघांना कारबाहेर पडता न आल्याचा अंदाज आहे. सात वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्यातून गाडी आणि दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
दोघांच्या हातामध्ये रिस्टबँड आढळले आहेत. त्यामुळे अपघाताच्या आदल्या रात्री ते एखाद्या क्लबमध्ये गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. शुभम देडगे हा पुण्यातील कीर्कतवाडी भागातील रहिवासी होता, तर ईश्वरी देशपांडेही पुण्यात राहायची. दरम्यान, ईश्वरी देशपांडे हिने एका मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्याची माहिती आहे. या सिनेमांचे चित्रिकरण पूर्ण झाले होते, मात्र स्वतःचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.