माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य पुढाकार
| तळा | प्रतिनिधी |
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील जी.एम. वेदक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत एका नव्या सामाजिक चळवळीचा पाया रचला आहे. मराठी एकता संघ रायगड या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी ही संघटना कार्य करणार आहे.
या संघटनेची स्थापना प्रामुख्याने जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्यासाठी करण्यात आली आहे. जी.एम. वेदक महाविद्यालयाच्या विविध शाखांमधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अभ्यासानंतर आता सामाजिक ऋणातून ही संघटना उभी केली आहे. केवळ राजकीय हेतू न ठेवता, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची घटत असलेली संख्या महाविद्यालयात तासीकेला कमी असलेली उपस्थिती व अश्या विविध उपक्रमांकारीत मंथन या दृष्टीने ही संघटना प्रयत्न करणार आहे. सन 2019 च्या बॅच मधील सिद्धेश कदम,अपूर्वा जाधव, श्रेयस रोडे, सुरभी ठाकूर, हर्षल राजमाने, सुमित शिंदे, विश्वजीत गनतांडेल, अक्षय सुतार, ऋतिक मोरे, गणेश कदम, रोशन बाबरे, कल्याणी बाबरे, अक्षता कुंभार या विद्यार्थ्यांनी मराठी एकता संघ रायगड स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या स्त्युत्य उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







