| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्नाटकमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक- महाराष्ट्र एसटी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
बेळगावात सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. सुवर्ण सौधा येथे हा महामेळावा होणार होता. पण, मेळाव्याला जातानाच एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या महामेळाव्याला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला असून, त्याचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.







