। ठाणे । प्रतिनिधी ।
सिडको महामंडळामध्ये सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील एकूण 101 रिक्त पदे भरण्यासाठी मागील वर्षी ऑनलाईन अर्ज मागविले होते. सदर परीक्षेकरिता असलेल्या अभ्यासक्रमातून मराठी विषय वगळल्याची तक्रार काही मराठी इच्छुक उमेदवारांनी मनसेचे संदीप पाचंगे यांच्याकडे केली होती. संदीप पाचंगे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर मराठी विषय परीक्षा प्रक्रियेत समाविष्ट केल्याची अधिसूचना सिडको प्राधिकरणाने काढली आहे.
सिडको महामंडळाने 18 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. इंग्रजी, सामान्यज्ञान, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान हे परिक्षेचे विषय देण्यात आले होते. एकूण 200 गुणांच्या या परिक्षेत मराठी हा विषय वगळण्यात आला होता. याबाबत इच्छूक मराठी उमेदवारांनी मनसेचे संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली होती. पाचंगे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व संबंधित प्राधिकरणाशी नोव्हेंबर 2024 ला पत्रव्यवहार केला होता. अखेर संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सिडको प्राधिकरणाने 9 जानेवारी 2025 रोजी एक शुद्धीपत्रक काढत मराठी विषय परिक्षेत समाविष्ट केल्याचे जाहीर केले आहे. मराठी विषय समाविष्ट करण्यासाठी पाठपुरवठा करणार्या संदीप पाचंगे यांचे मराठी उमेदवारांनी आभार मानले आहेत.