| पनवेल | वार्ताहर |
उलवे परिसरात राहणार्या 20 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय शाळकरी मुलीला धमकावून जबरदस्तीने तिचे अश्लिल फोटो काढून ते त्याने सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पिडीत मुलीच्या शाळेजवळ गेला असताना, नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
या घटनेतील 14 वर्षीय पिडीत मुलगी आणि अटक आरोपी वुर्बान असलम शेख (20) दोघेही उलवे परिसरात राहण्यात असून, सदर मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. वुर्बान शेख मागील 2 वर्षापासून पिडीत मुलीच्या मागे लागला होता. काही महिन्यापूर्वी त्याने सदर मुलीला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले. या प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीत मुलीने आरोपी सोबत दुरावा ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर देखील पिडीतेने त्याला टाळण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने काही दिवसांपूर्वी सदर मुलीचे अश्लील फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल केले. या प्रकाराची माहिती पिडीत मुलीला मिळाली होती. त्यानंतर वुर्बान सदर मुलीच्या शाळेजवळ तिचा पाठलाग करत गेला होता. यावेळी पिडीत मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी वुर्बानला पकडून त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उलवे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वुर्बान याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.