| पनवेल | वार्ताहर |
चिकन बनविण्यासाठी आणि दारु पिण्यासाठी वर्गणी न देता, फुटक खाण्या-पिण्यासाठी येणार्या मन्नु शर्मा याला विरोध केल्याने संतप्त मन्नु शर्मा याने हाताबुक्क्यांनी आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केल्याने जयेश वाघे या मित्राचा मृत्यू झाल्याची घटना खारघरमधील बेलपाडा येथे घडली. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी आरोपी मन्नु शर्मा याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या घटनेतील मृत जयेश वाघे (23) आणि त्याची हत्या करणारा मन्नु शर्मा दोघेही खारघर, सेक्टर-3 मधील बेलपाडा येथे राहण्यास असून दोघेही मित्र आहेत. जयेश वाघे कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता, तर आरोपी मन्नु शर्मा टेम्पो चालवत होता. जयेश, मन्नु आणि त्यांचे मित्र नेहमी वर्गणी काढून चिकन तसेच दारुची पार्टी करीत होते. मन्नु शर्मा वर्गणी न देता त्यांच्या पार्टीत फुकटचा सहभागी होत होता. जयेश वाघे आणि त्याच्या मित्रांनी बेलपाडा येथील आदिवासी वाडीतील क्रिकेट मैदानाजवळ चिकनची पार्टी करण्यासाठी वर्गणी काढली होती. या पार्टीत देखील मन्नु शर्मा वर्गणी न देता त्यांच्यामध्ये सहभागी झाला होता. मन्नु शर्मा नेहमी वर्गणीचे पैसे न देता पार्टीत सहभागी होत असल्याने जयेश आणि मन्नु शर्मा या दोघांमध्ये वाद होऊन शिवीगाळी झाली. त्यामुळे जयेशने मन्नु शर्मा याच्या कानाखाली चापट मारली. या गोष्टीचा मन्नु शर्मा याला राग आल्याने त्याने जयेशच्या छातीवर अणि पोटावर हाताबुक्क्यांनी तसेच लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. यात जयेश गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर जयेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयेशच्या मृत्युनंतर आरोपी मन्नु शर्मा याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी दिली.