। रायगड । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्याच्या सकारात्मक हेतूने शासनाने दोन वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये विभाजन करून धड्याचे व कवितेच्या पाठीमागे आवश्यकतेनुसार वहीचे पान जोडले होते. मात्र, ज्या उद्देशाने ही पाने पुस्तकांमध्ये जोडण्यात आली होती, तो उद्देश सफल न झाल्याचे शासनाच्या निदर्शन आले आहे. त्यामुळे 2025-2026 या वर्षापासून पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तके वहीच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि 28) निर्गमित करण्यात आला आहे.
मार्च 2023 मध्ये राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. तसेच, दप्तराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवी या इयत्तांकरिताची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात आली होती. प्रत्येक धडा व कवितेच्या पाठीमागे वहीची पाने जोडण्यात आली होती.
या पृष्ठांवर विद्यार्थ्यांकडून वर्गात शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी घेणे, जसे शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, महत्त्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य, इत्यादी बाबी अपेक्षित होत्या. यामध्ये शुद्धलेखन नोंदवणे अपेक्षित नव्हते. पाठ्यपुस्तकातील ही पाने माझी नोंद या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक होती. मात्र, या योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वहीच्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच, या योजनेचा उद्देश हा दप्तराच्या ओझे कमी करणे असा होता. परंतु, विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याने दिसून आले.
पाठ्यपुस्तकांमधील वहीच्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही. वस्तुस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2025-26 व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नेहमीची पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवात उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
दप्तराचे ओझे वाढणार?
दोन वर्षांपूर्वी प्रत्येक विषयाचे स्वतंत्र एक पुस्तक राहायचे. त्यामुळे पुस्तक व वही असे दप्तराचे ओझे वाढले होते. 2023-24 पासून हे ओझ कमी करण्यासाठी पुस्तके चार भागात व पुस्तकातच वहीचे पान जोडली होती. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच पुस्तके दिल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे काही प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येणार आहे.