मॅरेथॉन ठरली अखेरची! दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू

| तलासरी | वृत्तसंस्था|

पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेवजी येथील एका इंग्रजी शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धेनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील शर्यतीनंतर अवघ्या काही वेळातच एका 15 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रोशनी गोस्वामी असे या विद्यार्थीनिचे नाव आहे. या घटनेमुळे उंबरगाव व तलासरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तलासरी तालुक्यातील वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमीमध्ये शनिवारी (दि.3) वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या रोशनी गोस्वामी हिने भाग घेतला आणि तिने तिसरा क्रमांकही पटकावला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. शर्यत पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तिला धाप लागली. ती मैदानावर खाली बसली आणि बेशद्ध पडली. तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, शाळा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

माझ्या मुलीला काहीही झाले नव्हते. ती सकाळी नियमित वेळेवर उठली. घरात स्वयंपाक केला आणि भावाला जेवणाचा डबा दिला. स्वतः नाश्ता केल्यानंतर तिने मॅरेथॉनला जाते म्हणून सांगितले आणि दुपारी मला शाळेकडून माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी देण्यात आली.

-सुनीताबेन गोस्वामी,
रोशनीची आई

Exit mobile version