। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा क्रीडा परिषद, रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरू युवा केंद्र, रायगड, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग व रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि.4) अलिबाग येथे सकाळी 7 वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पीएनपी कॉलेज विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणार्या संदीप पाल या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने साडेपाच किलोमीटर अंतर 18.26 सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेत पीएनपीच्या सिनिअर आणि ज्युनिअर कॉलेजच्या 18 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौटेला, केंद्रीय माहिती व प्रसार संचालनालयाचे फनीकुमार, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या तपस्वी गोधळी, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सरुवात करण्यात आली.
ही स्पर्धा रायगड बाजार ते सहाणगोठी अशी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे युवक, युवती व विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेची समाप्ती शहीद निलेश तुणतुणे यांच्या सहाणगोठी येथील स्मारकाजवळ करण्यात आली. यावेळी शहीद निलेश तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, आई निर्मला तुणतुणे, भाऊ शैलेश तुणतणे व इतर कुटुंबियांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तिरंगा झेंडा देवून सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक राजेश तांबोळी, तृतीय रामु पारधी, चतुर्थ गिरज पाटील, पाचवा सौरभ गोटुरे तर मुलींच्या गटामध्ये प्रथम कथा वाडकर, द्वितीय अमृता शेडगे, तृतीय भुमी म्हात्रे, चतुर्थ सेजल घरत, पाचवी कुजल नाईक या खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केले.
पीएनपीच्या संदीप पाल याने मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे यांनी अभिनंदन केले.