| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चौदा वर्षे रखडले असले, तरी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्यांच्या ठेकेदारांना अजून मुदतवाढ हवी आहे. परंतु, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च 2026 या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्ती केली आहे.
काम लांबल्याने मूळ अंदाजपत्रकापेक्षा सुमारे 30 टक्के कामात वाढ होणार आहे. अंदाजित दोन्ही टप्प्यांना प्रत्येकी 250 ते 300 कोटी वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने हा मार्ग पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदारांची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. यावेळी गडकरी यांनी ठेकेदारांना चांगल्या शब्दांत कानउघाडणी केली आहे.
मुंबई-गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपले अधिक लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणे हा एकमेव अजेंडा आहे. चौदा वर्षे काम अपूर्ण असल्याने शासनाला विरोधक आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाचा वारंवार पाहणी दौरा करत आहेत. अनेक मंत्र्यांनी दौरे केले, पाहणी केली, परंतु हा मार्ग काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. अनेक डेडलाईन दिल्या; परंतु त्यादेखील या मार्गाने खोट्या ठरवल्या. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्याचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, परंतु काम काही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अपूर्ण राहिलेले हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.






