महागाई – बेरोजगारी विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा

रेशनिंग व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी

। उरण । वार्ताहर ।

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.21) उरण तहसील कार्यालयावर वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढला होता. यावेळी राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेची अन्न सुरक्षा नष्ट करण्यासाठी सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवून केवळ करपात्र कुटुंबाचे रेशनिंग बंद करून स्वस्त धान्य दुकानातून साखर, तेल, डाळी यासारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्याची मागणी केली.

चारफाटा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या, महागाई वाढविणारे केंद्र व राज्य सरकार चले जावं, कामगार, महिला, युवक, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा चारफाटा उरण ते पालवी रुग्णालय, खिडकोळी नाका, गांधी चौक ते उरण तहसील असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चा कार्यालयावर पोहचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कामगार नेते भूषण पाटील, हेमलता पाटील,अमिता ठाकूर, कुसूम ठाकूर, रामचंद्र म्हात्रे यांनी आपले विचार मांडले.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी मोर्चाला सामोरे येत मोर्चाचे निवेदन स्वीकारले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते. मोर्चामध्ये सी.आय.टी.यु, डी.वाय.एफ.आय, जनवादी महिला संघटना व किसान सभा या संघटनांनी सहभाग घेतला होता. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता.

Exit mobile version