अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडीला मार्चचा मुहूर्त

जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा खेळ रंगला असताना तब्बल वीस दिवस प्रशासन गप्प बसल्याने राजकीय वर्तुळात संताप उसळला आहे. अखेर दबाव वाढल्यानंतर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 12 मार्चला निवडणूक घेण्याची घोषणा केली असली तरी इतका विलंब का झाला, यावर प्रशासनाकडे उत्तर नाही.

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी झाली. निकालात भाजपचे 15, राष्ट्रवादीचे 16, शिंदे गट शिवसेनेचे 21, ठाकरे गट शिवसेनेचे 5 आणि काँग्रेसचा 1 सदस्य निवडून आला. स्पष्ट बहुमत कोणालाही नसल्याने सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे डावपेच रचले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला असून, शिंदे गटाला विरोधी बाकावर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेबाबत कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत. जनतेच्या मतांचा कौल मिळूनही सत्ता स्थापन लांबणीवर टाकली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दरम्यान, 12 मार्च रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. दुपारी 2 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. अर्ज छाननी, माघार आणि आवश्यक असल्यास मतदान अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपसह शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. मात्र, सर्वात मोठा प्रश्न असा की, सत्तेचा तिढा सुटणार की पुन्हा राजकीय खेळींचा नवा अंक रंगणार? आता संपूर्ण रायगडचे लक्ष 12 मार्चकडे लागले आहे. सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि प्रशासनाची विलंबाची भूमिका यावर पुढील काही दिवसांतच पडदा पडणार आहे.

Exit mobile version