पोलिसांनी कारवाईत तीन लाखांचा गांजा केला जप्त
। खोपोली । प्रतिनिधी ।
शिळफाट्यावरील नवनाथ काँलनी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्रीपाद गणपत सूर्यवंशी (66) यांच्या घरात 3 लाख 22 हजार किमतीचा गांजा हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात अटक केलेले आरोपी शिंदे गटाचे नगरसेवक यांचे सासरे असल्याची चर्चा खोपोली शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटेल नगर जवळ समोरच मुंबई- पुणे जुन्या महामार्गाला लागूनच नवनाथ कॉलनी आहे. या ठिकाणी श्रीपाद गणपत सूर्यवंशी यांचा अगरबत्तीचा व्यावसाय आहे. त्यांच्या घरी गांजा आमली पदार्थ साठा असल्याची माहिती खोपोली पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाल्यावर मंगळवारी (दि.11) संध्याकाळी पाच वाजता छापा टाकला. यावेळी गोणी व सीलबंद केलेल्या खाकी पाकिटात गांजा सापडला. हा अमली पदार्थ 15 किलो 400 ग्रॅम एकूण मुद्देमाल 3 लाख 22 हजार 200 रूपये किंमतीचा गांजा तसेच एक मोबाईल फोन आणि वजन काटा जप्त केला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकार विशाल नेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन हिरे करीत आहे.







