तीन महिलांसह पाच जण अटकेत
। अमरावती । प्रतिनिधी ।
महागड्या कारमधून होत असलेल्या गांजा तस्करीचा गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कारसह 40.35 किलो गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 13.52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात तीन महिला आरोपींचा समावेश आहे.
गुन्हे शाखा युनिट-2 चे पथक हे आयुक्तालय हद्दीत शुक्रवारी (दि.04) सकाळी पेट्रोलिंग करीत असताना नांदगाव पेठ टोलनाक्याकडून वाळकी गावाकडे जाणाऱ्या रोडने एक काळ्या रंगाच्या चारचाकी कारमध्ये दोन पुरुष व तीन महिला गांजा विक्रीकरिता व डिलिव्हरी देण्याकरिता येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वाळकी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. त्याचवेळी एमएच 48 ए- 4900 क्रमांकाची कार थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये 40.35 ग्रॅम गांजा आढळून आला. याप्रकरणी सय्यद राशीद सय्यद जमशेद (35), अरफाक दानिश शब्बीर पटेल (23), दोघेही रा. जुनीवस्ती, बडनेरा, मयुरी विजय चापळकर (19), पुनम उमेश अंभोरे (30) व निकिता सुभाष गायकवाड (21) यांना अटक केली असून त्यांच्याकडून 8 लाख 6 हजार 600 रुपयांचा गांजा, 20 हजारांचे दोन मोबाईल, 5 लाख रुपये किमतीची कार, असा एकूण 13 लाख 52 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.