जेएनपीएमध्ये सागरी जलगुणवत्ता देखरेख केंद्र

। उरण । वार्ताहर ।
जेएनपीएने आयआयटी मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या सहकार्याने बंदरामध्ये एक सतत सागरी जलगुणवत्ता देखरेख केंद्र विकसित केले आहे. यासोबतच बंदरामध्ये विद्युत पर्यावरण निरीक्षण वाहनसुद्धा लाँच केले. या निरीक्षण केंद्र आणि ई-निरीक्षण वाहनाचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष उन्मेष वाघ व सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी बोलताना, जेएनपीएचे अध्यक्ष सेठी म्हणाले जेएनपीए शाश्‍वत विकासामध्ये अग्रस्थान साध्य करण्यासाठी आणि आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय मापदंडांमध्ये वर्णित व्यापार मूल्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. जेएनपीए नेहमीच पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार बंदर म्हणून विकसित होण्यासाठी आग्रही आहे. सतत सागरी जल गुणवत्ता देखरेख केंद्र आणि ई-वाहनांचे लाँचिंग हे शाश्‍वत विकासाच्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.असे त्यांनी सांगितले.

सतत सागरी जल गुणवत्ता प्रणाली आणि विद्युत निगरानी वाहनामुळे जेएनपीएला बंदर क्षेत्रातील सागरी जल आणि हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी, बंदर क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्तेचे नियमन करण्यास मदत होईल. त्याचबरोबर या सुविधेद्वारे, जल गुणवत्ता केंद्रामध्ये संकलित केल्या जाणा-या तापमान, पीएच, विरघळलेला ऑक्सिजन, अमोनिया, कंडक्टिविटी, नायट्रेट, क्षारता यासारख्या माहितीच्या आधारे बंदर परिसरातील पर्यावरणीय गुणवत्तेचे पालन व तपासण्याव्यतिरिक्त वाहनांमुळे निर्माण होणा-या हरित वायुचे प्रमाण कमी करण्यास जेएनपीए सक्षम होईल. सागरी पाण्याचा टीडीएस, सागरी पाण्याच्या गुणवत्तेचा डेटाबेस सागरी वातावरणात स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक आहे. ई-वाहनांमुळे जेएनपीए मध्ये सुरू असलेल्या परिवेशी वायु गुणवत्ता आणि ध्वनी निरीक्षण क्रियाकलापांना देखील पुष्टी प्राप्त होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

विविध सुविधा उपलब्ध
जेएनपीएने विविध पर्यावरणीय सुधारणा आणि हरित बंदर उपक्रम सुरू केले आहेत उदा: सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, सतत परिवेशी वायु गुणवत्ता देखरेख केंद्र व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, बंदर परिसरात आणि टाउनशिपमध्ये एलईडी दिवे, ई-आरटीजीसीएस, किनार्‍यावरील वीज पुरवठा, शेवा मंदिर आणि शेवा टेकडीच्या पायथ्याजवळील तलावांचे पुनरुत्थान, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे सुलभ वाहतूकीसाठी केलेले उपाय, खारफुटीचे व्यवस्थापन, तेल गळती प्रतिसाद इत्यादीसह पोर्ट ग्रीन कव्हर. यासोबतच जवाहरलाल नेहरू पोर्टने सुमारे 4.10 मेगावाट क्षमतेचे सौर पॅनेल देखील स्थापित केले आहेत. बंदराच्या 38% उर्जेची आवश्यकता अक्षय ऊर्जेतुन पूर्ण होते. जेएनपीएने उर्जेचा वापर कमी करण्यासाठी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंदर परिसरात एलईडी दिवे देखील लावले आहेत.

Exit mobile version