टेहळणी करणार्या पोलीस चौक्या, स्पीड बोटी झाल्या नादुरुस्त
| उरण | प्रतिनिधी |
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण परिसरातील सागरी सुरक्षादेखील रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून खबरदारी म्हणून सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल या ठिकाणी पोलीस चौकी, खाडीकिनारी स्पीड बोटींची गस्त घालण्याचे आदेश दिले होते. परंतु, टेहळणी करणार्या पोलीस चौक्या, इमारती तसेच स्पीड बोटी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे.
काश्मीर पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या घटनेमुळे केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटून अनेकांनी निषेध व्यक्त करत आपल्या देशबंधूंना आदरांजली अर्पण केली. मात्र, मुंबई शहरावरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सागरी सुरक्षेमध्ये होत असलेला हलगर्जीपणा समोर येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी अरबी समुद्र किनार्याचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने गृह विभागाने मोरा बंदरात मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने उभारणी केली. तसेच सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, गव्हाण फाटा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल, दिघोडे या ठिकाणी पोलीस चौकी, खाडीकिनारी स्पीड बोटींची गस्त घालण्यासाठी स्पीड बोटी खरेदी केल्या होत्या.
मात्र, आजपर्यंत त्या चौक्या वापरात न आल्याने नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने बांधण्यात येणारी इमारत निधीअभावी धूळखात अर्धवट स्थितीत पडून राहिली आहे. तर समुद्रात, खाडीकिनारी गस्त घालण्याचे काम करणार्या स्पीड बोटीही नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या आहेत. तरी राज्य व केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
काश्मीर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नुकतीच शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. तसेच ज्या ठिकाणी पोलीस चौक्या आहेत, त्यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.
जितेंद्र मिसाळ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण