होळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या

आकर्षक पिचकाऱ्या, रंग खरेदीकडे पनवेलकरांचा वाढता ओढा

| पनवेल | वार्ताहर |

होळीचा सण काही तासांवर आला असून पनवेल परिसरातील बाजारांमध्ये पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग, टी-शर्ट्स यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. होळी, रंगपंचमीच्या खरेदीसाठी पनवेल शहरासह, नवीन पनवेल, खांदा वसाहत, करंजाडे, कामोठे, कळंबोली, खारघर आदी भागातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. बच्चे कंपनीला आकर्षक पिचकाऱ्यांनी भुरळ घातली आहे. विविध रंगांचे स्टॉल दाखल झाले आहेत. तेथे पिचकाऱ्याही विक्रीकरिता ठेवण्यात आल्या आहेत. रंग पिचकाऱ्या यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. वीकेंडला त्यात अधिक भर पडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच तरुण पिढीला रंग उधळताना फोटोशूट करण्याकरिता स्प्रे सिलिंडर कलरही बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याला तरुण पिढीची अधिक पसंती आहे.


हॅप्पी होलीच्या टी-शर्ट्स
हॅप्पी होली, रंग बरसे, बुरा न मानो होली अशी वाक्य लिहलेले टी-शर्ट्स सध्या बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. विविध रंगांतील या टी-शर्ट्सने आता डिस्प्लेची जागा हक्काने घेतली आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साइजचे टी-शर्ट्स मिळत आहेत. मुलांसह महिलादेखील या टी-शर्ट्स खरेदी करत आहेत.
कार्टून पिचकाऱ्यांची भुरळ
यंदा बाजारांत हॉकी स्टिक, बंदूक आणि वॉटरगनच्या आकारांसह कार्टून्सचे चित्र आणि त्यांच्या आकाराच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. विशेषतः डॉरेमॉन, स्पायडरमॅन, छोटा भीम, मोटू-पतलू अशा विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्या मुलांच्या पसंतीला उतरत आहेत. यंदा या पिचकाऱ्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यांचे दर 240 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहेत.
नैसर्गिक रंग खरेदीकडे ओढा
रासायनिक रंगांसह बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे यांना ग्राहकांकडून मागणी आहे. रासायनिक रंग तुलनेने कमी किमतीला मिळत असल्याने त्याची अधिक खरेदी होत आहे; परंतु आता नैसर्गिक रंगांकडे ग्राहकांचा ओढा वाढतो आहे. विविध रंगाचे फुल, पान, हळद अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवण्यात आलेल्या रंग बाजारात उपलब्ध आहेत. रासायनिक रंगांचे दर हे 10 ते 30 रुपये प्रति पॅकेट असून नैसर्गिक रंगाचे तेवढेच पॅकेट 120 रुपयांना मिळत आहे.
Exit mobile version