। तळा । वार्ताहर ।
दिपावली सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तळा बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाश कंदिल, पणत्या, विविध प्रकारची रांगोळी, रांगोळी काढण्याचे साचे, लहान मुलांच्या बंदुका, विविध प्रकारचे फटाके, सुगंधी उटणे अशा अनेक साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच तळा बाजारपेठेत नागरिक दिवाळी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असत. यामुळे व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या दुकानात दिवाळीत लागणार्या साहित्यांचा माल भरला आहे. मात्र, नागरिकांची शेतीची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने दिवाळीला पाच दिवस बाकी राहिलेले असताना देखील नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नाहीत. यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण असून दिवाळीच्या काळात नागरिक फटाक्यांसह दिवाळीचे साहित्य खरेदी करतील अशी आशा बाजारपेठेतील व्यापार्यांना आहे.