सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा गजबजल्या

ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
| अलिबाग | वार्ताहर ।
‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ म्हणत साजरा होणारा होळी सण सोमवार, दि. 6 मार्च रोजी, तर रंगांची उधळण करणारा अर्थात धुळवड मंगळवारी 7 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. त्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी रविवारी 5 मार्च रोजी सुटीचा मुहूर्त साधत नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. यंदा सोमवारी होळी सण साजरी होत आहे. होळी हा वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करा, असा संदेश देणारा सण. त्यासाठी ‘होलिका’दहन केले यानिमित्त गोवर्‍या, पूजेचे साहित्य, टिमक्या, पिचकार्‍यांची आणि धुळवडीसाठी रंगांना मागणी वाढली.

वाईट गोष्टी नाकारून चांगल्याची सुरुवात करताना धार्मिक व शास्त्रीयदृष्ट्या होळीच्या सणाला महत्त्व आहे. होळी पेटविल्यानंतर सुवासिनींकडून तिची पूजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो. नारळाची आहुती देतात. ते भाजल्यानंतर खोबर्‍याचा प्रसाद वाटप केला जातो. यावेळी बोंब मारण्याचीही प्रथा आहे. दुसर्‍या दिवशी धुळवड खेळण्याची परंपरा आहे. होळीची राख अंगाला लावणे हे चांगले असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी अनेकजण रंग खेळत असल्याने बाजारात विविध रंग विक्रीसाठी आले आहेत.

Exit mobile version