। नवीन पनवेल । वार्ताहर ।
सलमान खान सोबत लग्न करण्याच्या हट्ट धरलेली (25 ) वर्षीय तरुणी सलमान खानच्या पनवेल जवळील फार्म हाऊस जवळ पोहोचली. पोलिसांनी या तरूणीला समजावल्यानंतर तिला जवळच्या आश्रमामध्ये नेण्यात आले. त्यानंतर तिला कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. त्या तरुणाने तिला लग्नासाठी नकार दिला. याचा तिला धक्का बसला व त्यानंतर तिने सलमान खान सोबत लग्न करायचे आहे, असे बोलून पनवेल गाठले. ही तरुणी यापूर्वी पाच वर्षे दिल्लीत राहायची. यापूर्वी ती तीन वेळा घराबाहेर गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मानसिक रुग्ण आहे. (दि.22) मे रोजी ती सलमान खानसोबत लग्न करायचे आहे, असा चंग बांधून पनवेल तालुक्यातील सलमान खानच्या फार्म हाऊसच्या दिशेने निघाली. नेरे परिसरात आल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिची चौकशी केली त्यानंतर तिने सलमान खान सोबत लग्न करायचे आहे, असे सांगितले. ती मानसिक रुग्ण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी काही काळाकरता तिला जवळच्या आश्रमात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्यावर सध्या एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत.