| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून ‘निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा’ या भूमिकेतून प्रचार सुरू आहे. अशी ठाम भूमिका शेकाप-महाविकास आघाडीचे आदई पंचायत समितीचे उमेदवार विलास फडके यांनी मांडली. नेरे जिल्हा परिषद गटात प्रचारादरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी विलास फडके यांनी सांगितले की, या ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. आठवड्यातील फक्त दोन दिवस पाणी येते, तर उर्वरित दिवशी पाणीच उपलब्ध नसते, अशी व्यथा नागरिकांनी व्यक्त केली. हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दादागिरी व पैशाच्या बळावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता जनता थारा देणार नाही. जनतेला विकास, प्रामाणिकपणा आणि सातत्याने संपर्कात राहणारे प्रतिनिधी हवे आहेत. याआधी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी निवडणुकीनंतर कधीही मतदारांशी संपर्क ठेवला नाही. जनतेच्या समस्या, अडचणी व विकासकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मी नेहमीच जमिनीवर राहून जनतेच्या समस्या समजून घेत काम करत आलो आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. माझ्या प्रामाणिक कामाची दखल जनता यावेळी नक्कीच घेईल, असा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला. यावेळी अदाई पंचायत समिती गणाचे उमेदवार विलास फडके यांच्यासह नेरे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मारुती भस्मा, शेकाप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







