| पुणे | प्रतिनिधी |
प्रेम आणि संशय यांच्या नाजूक धाग्यात गुंफलेल्या एका लव्ह स्टोरीचा हिंजवडी परिसरात अत्यंत रक्तरंजित शेवट झाला. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने 18 वर्षीय प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी परिसरात असलेल्या या चॉपर हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ साखरे वस्तीजवळ वर्दळीच्या ठिकाणी घडली. 18 वर्षीय तरुणी या ठिकाणी आली असता मुख्य आरोपी योगेश भालेराव आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तरुणीवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. ज्यामुळे ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर काही नागरिकांनी जखमी तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाकडून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात आहे.







