सासरच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला गुप्ता असे या मयत महिलेचे नाव आहे. या महिलेचे 2025 मध्ये प्रध्युमन यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नामध्ये सहा लाख रुपये, सोन्याच्या अंगठ्या आणि एक तोळ्याची सोन्याची चेन असे ठरविण्यात आले होते. लग्नाच्या अगोदर काही रक्कम देण्यात आली होती. मात्र, शिल्लक राहिलेली रक्कम व दागिन्यांचा ऐवज मिळविण्यासाठी विवाहित महिलेचा वारंवार छळ केला जात होता. तसेच अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकत होते. पतीसह सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन जीवन संपविले. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत प्रध्युमन गुप्ता, जोखन गुप्ता, मंजू गुप्ता या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मंडळी मूळची उत्तर प्रदेश राज्यातील असून, सध्या विद्यानगर येथे राहात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिले करीत आहेत.

Exit mobile version