| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बुरुमखाण येथील 42 वर्षीय विवाहित महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. 18) नवेदर-नवगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे अलिबाग तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छाया पाटील (42) असे मृत महिलेचे नाव असून, त्या अलिबाग तालुक्यातील बुरुमखाण येथे वास्तव्यास होत्या. निलेश घासे (वय 42) असे आरोपीचे नाव असून, तो नवेदर-नवगाव येथील रहिवासी आहे. मृत महिलेचे आरोपीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या संबंधांमुळे महिलेचे तिच्या पतीसोबत वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित महिला आरोपीच्या घरी नियमित ये-जा करीत होती. आरोपी आणि महिलेमध्येही अनेकदा वाद होत असल्याचे तपासात पुढे आले आहे. गुरुवारी (दि. 18) महिलेचे तिच्या पतीसोबत वाद झाल्यानंतर त्या आरोपीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी आणि महिलेमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, आरोपीनेच महिलेस मारहाण केल्याची तक्रार मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे दिल्यानंतर तपासाची दिशा बदलली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी निलेश घासे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याला अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







