सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन

कामोठे पोलीस ठाण्यात सासू, नणंद आणि 2 दिरांवर गुन्हा दाखल

। पनवेल । प्रतिनिधी ।

पतीच्या निधनानंतर मालमत्तेच्या वादातून आणि सासरच्या मंडळींकडून होणार्‍या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका 38 वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पा सतीश शिरोळे असे मृत महिलेचे नाव असून, तिने गत 16 फेब्रुवारी रोजी कुलाबा येथे समुद्रात उडी टाकुन आत्महत्या केली होती. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी सासू, नणंद आणि दोन दिरांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या घटनेतील मृत पुष्पा शिरोळे यांचा विवाह 2014 मध्ये सतीश शिरोळे यांच्याशी झाला होता. पती सतीश यांचे जून 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर पुष्पा या आपल्या दोन लहान मुलांसह कामोठे येथील फ्लॅटमध्ये राहत होत्या. पतीच्या निधनानंतर मिळणारे लाभ, विम्याचे पैसे आणि कामोठे येथील घराच्या मालकी हक्कावरुन सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. मृत पुष्पा यांच्या सासू कोंडाबाई शिरोळे, नणंद प्रतिभा शिरोळे, दीर संदीप शिरोळे आणि विनायक शिरोळे हे वारंवार पैशांची मागणी करत होते. मुंबईतील ताडदेव आणि लोअर परेल येथे स्वत:ची दुकाने आणि मालमत्ता असूनही, ही मंडळी पुष्पा यांच्याकडे असलेल्या कामोठे येथील फ्लॅटमध्ये हिस्सा मागत होती. या वादातून त्यांना सतत शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाबाबत त्यांनी यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये कामोठे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पुष्पा यांनी राहत्या इमारतीच्या टेरेसची चावी मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलीला, मी आता कधीच घरी येणार नाही’, असे सांगून घर सोडले. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह कुलाबा परिसरातील समुद्रात मिळून आला होता. पुष्पा यांनी सासरकडील मंडळींच्या जाचाला कंटाळून समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत पुष्पा यांचे भाऊ गणेश हाडवळे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन लहान मुलांच्या डोक्यावरुन पित्यानंतर आता मातेचेही छत्र हरवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version