लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार

। उरण । प्रतिनिधी ।

उरणच्या शेलघर गावातील 39 वर्षीय व्यक्तीने विवाहित महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार केला. तसेच पीडित महिलेकडून महागड्या वस्तू, रोख रकमेसह 12 लाख 35 हजार रुपये घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपीसोबत काही काळापासून प्रेमसंबंध होते. याच संबंधाचा गैरफायदा घेत आरोपीने नोव्हेंबर 2024 पासून ते नोव्हेंबर 2025 या काळात पीडित महिलेच्या घरी जाऊन लग्नाची खोटी आश्वासने दिली होती. या वेळी दोघांमध्ये अनेक वेळा जबरदस्तीने शरीरसंबंध झाले. आरोपीने पीडितेकडून वेळोवेळी महागड्या वस्तू आणि रोख रक्कम अशी 12 लाख 35 हजार रुपये घेतले होते. आरोपीने पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचार केला होता. तसेच भांडाफोड होऊ नये, यासाठी पीडित महिला आणि तिच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर पीडित महिलेने उरण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Exit mobile version