| नेरळ | प्रतिनिधी |
हुतात्मा भाई तथा विठ्ठलराव कोतवाल यांच्या 113वे जयंतीनिमित्त कर्जत, माथेरान आणि नेरळ येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माथेरान येथे नगरपरिषदेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी मशाल फेरी काढण्यात आली. 1 डिसेंबर 1912 मध्ये माथेरानमध्ये जन्मलेले विठ्ठलराव कोतवाल यांनी देश पारतंत्र्यात असताना 1937 मध्ये भाई कोतवाल यांनी माथेरान शहरातील कष्टकरी कामगार वर्गासाठी भाऊसाहेब राऊत यांच्या मदतीने माथेरान नागरी पतसंस्था स्थापन केली. तर 1942 मध्ये महात्मा गांधी यांच्या ब्रिटिशांविरुद्ध ‘चले जाव’ची हाक दिली होती. त्यावेळी कर्जत तालुक्यातील देशप्रेमी तरुण यांना एकत्र करून देशाच्या स्वतंत्र लढ्यात भाग घेतला होता. त्यांना 2 जानेवारी 1943 मध्ये ब्रिटिशांच्या गोळीचा वेध घेतल्याने ते हुतात्मा झाले होते. त्यांचा जयंती दिवस माथेरान तसेच कर्जत आणि नेरळ येथे अभिवादन करण्यात येते. नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कर्जत येथे आमराई परिसरात असलेल्या क्रांतिस्तंभ येथे कर्जत शहरातील नागरिकांनी अभिवादन केले. तर भडवळ येथील कोंडीराम शेंडे विद्यालयात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.







