चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा

हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

| उरण | वार्ताहर |

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या 94 वा स्मृती दिनाचा कार्यक्रम बुधवार दि. 25सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही 25 सप्टेंबर 1930 साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले होते.

”शांततामय रितीने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये 20 ते 22 वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्‍वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर अनेकजण जखमी झाले.

स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिध्द आहे. या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मुळगावी उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शासकीय इतमानाने साजराही करण्यात येतो. बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना दिली जाते. पुष्पचक्र वाहात हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.”

तसेच हुतात्म्यांच्या वारस, कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार, सन्मान करण्यात येतो. ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि स्वातंत्र संग्रामातील सुवर्ण पान म्हणून ओळखला जाणार्‍या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा 94 वा स्मृतीदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. ठिक बारा वाजता पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकापचे प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, रवी पाटील, माजी ट्रस्टी भूषण पाटील, उद्योगपती पी. पी. खारपाटील, राजा खारपाटील, कामगार नेते संतोष पवार, सरपंच भास्कर मोकल, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिंदे गटाचे अतुल भगत, दीपक ठाकूर, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version