| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या नावाने उभारलेल्या चिरनेर गावातील हुतात्मा स्मारकाच्या सभागृहाच्या छताच्या सिलिंगची पडझड झाली आहे. या पडझडीमुळे ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाला भेटी देणारे पर्यटक नाक मुरडत असून, चिरनेर ग्रामस्थांबरोबर स्वातंत्र्यप्रेमी देशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात जे-जे उठाव झाले त्यात चिरनेरच्या जंगल सत्याग्रहाचा आवर्जून समावेश करावा लागेल. ब्रिटिशांच्या विरोधात ज्या वीरांनी आपले हौतात्मे दिले. त्यात चिरनेरच्या जंगल सत्याग्रहातील सर्वच हुतात्म्यांचा सहभाग होता. या हुतात्म्यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्मारके आजही प्रेरणादायी आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीच्या कर्तव्यात कसूर होत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला या हुतात्मा स्मारकाच्या सभागृहाच्या छताची झालेली पडझड दिसली नाही का? असा सवालही नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे. येत्या 25 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पूर्वी हुतात्मा स्मारकाच्या छताच्या सिलिंगच्या पडझडीची दुरुस्ती संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने करावी, अशी मागणी या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.






