| रेवदंडा । वार्ताहर ।
चौलचे प्राचिनत्व इ.स.पुर्व 1200 पर्यत नेता येते. 2000 वर्षापेक्षा प्राचीन इतिहास असलेल्या या नगरीस पुरातनकालात चौल चंपावती नगरी या नावाने संबोधले जात असे. प्राचीन काळी या नगरीत सोळा हजार इमारती होत्या. त्याप्रमाणे भोर्सी, पेठ, गडगा, नवेदरपेठ, मळा आदी 16 पाखाडयात विभागलेले हे चौल चंपावती नगर होते. या नगरात 360 मंदिरे व 360 तलाव होते. चौलच्या सोळा पाखाडयातील गडगा पाखाडी ही चौल हनुमानपाडा परिसरात असावी, येथेच चौलच्या इतिहासाच्या साक्षीदार गडग्यातला मारूती मंदिर जागृत देवस्थान म्हणून आजही प्रसिध्दीस आहे.
अलिबाग तालुक्यात चौल-वावे या मुख्यः रस्त्यालगत चौल ग्रामपंचायत अंतर्गत असलेले हनुमानपाडा हे छोटेसे गाव आहे. या गावाला हनुमानपाडा हे नाव येथील मारूती मंदिरावरून पडले आहे. प्राचीन चौलमधील 16 पाखाडयापैकी गंडगा पाखाडी असा या भागाचा इतिहासात उल्लेख आढळतो. चौल-वावे रस्त्याला हनुमानपाडा गावानजीक दक्षिणेला हे मंदिर आहे. चौल नगरीतील एकमेव दक्षिणामुखी असलेले हे जागृत मारूती मंदिर आहे. या दक्षिणामुखी मारूती मंदिरात दर्शनासाठी नित्याने तसेच विशेष श्रावण महिन्यात शनिवारी श्री मारूतीरायाच्या आजही भाविक मोठया संख्येने येत असतात.
हे मंदिर फारच जुने असल्याने या मंदिराचा जिर्णोध्दार येथील ग्रामस्थ मंडळाने लोकवर्गनीतून केला. या मंदिराचा जिर्णोध्दाराने भव्य व दिव्य अशी मंदिराची वास्तू निसर्ग रम्य परिसरात उभी आहे. या मंदिरात दक्षिणेकडून प्रवेशव्दार असून मंदिराचे प्रांगणात नुकताच मंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करतानाच प्रथम भव्य सभागृह लागते, मंदिराचा आतील सभागृह भव्य असून गाभार्यांतील श्री मारूतीरायांची प्रसन्न मुर्ती लक्ष्य वेधून घेते. त्यानंतर मंदिराचा गाभार्यात श्री मारूतीरायाची प्रसन्न मुर्ती दर्शनाने भाविक निश्चित पणे नतमस्तक होतो. या मंदिरात बसल्यावर वेगळीचा शांती व समाधान मनाला लाभतो.
गडग्यातील मारूती मंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर तिनशे वर्षापुर्वीचे असावे, या मंदिराची इतिहासकालीन आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, पुर्वी मुघलानी या परिसरात चढायी केली असताना ‘यवन’ हे मंदिर उध्वस्त करायला आले असताना मंदिरातील मारूतीरायानी स्वतःभोवती दगडांचा गडगा रचून घेतला. मंदिर उध्वस्त करावयास आलेल्या सैन्याला देवळात मुर्ती नसून केवळ दगडी चौधरा आहे असे वाटल्याने मुर्तीभंजन झाले नाही. पण सैनिक मंदिर उध्वस्त करू लागले असताना चत्मकार घडला, त्या गडग्यातून असंख्य घोंगरे (भुंगे) बाहेर निघाले आणी आलेल्या सैन्याला त्यानी पिटाळून लावले. अशाप्रकारे मारूतीरायांनी स्वतः सुटका केली. नंतर गावातील लोकांनी त्यास मुक्त केले व मंदिराची दुरूस्ती केली. या कथेतील चत्मकार सोडला तरी यवन मंदिर उध्वस्त करायला आले होते हे मात्र खरे असल्याचे आढळते. कारण या मंदिरासमोर सुमारे दोन चारशे पावलांवर शिवमंदिर श्री वैजनाथ मंदिर उध्वस्त केलेले आहे. त्याचे भग्नावषेष अदयापी पहावयास मिळतात.