इर्शाळवाडीतील सामूहिक दशक्रिया विधी

| रसायनी | वार्ताहर |

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत 29 जणांचा मृत्यू, तर 57 बेपत्तांना मृत घोषित करण्यात आले होते. या घटनेत बेघर झालेल्यांना मदतीचे काम सुरू आहे. दरम्यान, आज मृतांच्या नातेवाईकांकडून साश्रुनयनांनी दशविधी क्रिया करण्यात आली. यावेळी चौक येथे राज्यातून आलेल्या मृतांच्या नातेवाईकांसह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही डोळे पानावले होते.


इर्शाळवाडी घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले. या घटनेतील मृतांच्या नातलगांकडून घटनास्थळीच दशविधी क्रिया करण्यात आली. मृत पावलेल्यांचा दशविधी क्रिया विधी परंपरेप्रमाणे सार्वजनिकरित्या करण्याच्या उद्देशाने सर्व तयारी करण्यात आली होती. यासाठी लागणारे साहित्य, मृत व्यक्तींचे फोटो फ्रेम, विधीसाठी जंगम व्यवस्था प्रशासनाने केली. यावेळी मुंडण करण्यासाठी नाभिक समाजाची मदत, वाहतुकीसाठी वाहने, विधीनंतर भोजन इत्यादी व्यवस्था करताना आपल्याच नात्यातल्या कोणाचा विधी असल्याप्रमाणे प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी झटताना दिसून आले.

विदारक क्षण कधीच विसरता येणार नाहीत. इर्शाळवाडी दुर्घटनेत बेघर झालेल्यांना पुढील काही दिवसांत निवारा मिळणार आहे. त्यासाठी कॉलनीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी बांधव दुःखातून सावरून हळूहळू पूर्वपदावर येतीलही. कदाचित काळाच्या आड सगळं विस्मृतीत निघून जाईल, मात्र ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे, त्यांच्या मनपटलावरून ते विदारक क्षण कधीच पुसले जाणार नाहीत.

Exit mobile version