श्रीवर्धनमध्ये इमारतीला भीषण आग; लाखो रुपयांची हानी

नगरपालिकेचा अग्निशमन यंत्रणेचा भोंगळ कारभार

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन नगर नगरपालिकेच्या थोडे पुढे व पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या एका बैठ्या इमारतीला शनिवारी (दि.5) रात्रौ 11 च्या सुमारास भीषण आग लागली. तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात यश आले. आगीत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

येथील वसंत गजानन यादव यांच्या मालकीच्या या इमारतीमध्ये एका छोट्या गाळ्यात श्‍वेत पोलेकर यांचे कार्यालय व उर्वरित दोन गाळ्यांत या इमारतीच्या समोरच असलेल्या मनोहर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड मोबाईल झोन या शो रूमचे फर्निचरचे गोडाऊन होते. या ठिकाणचे साहित्य आगीत खाक झाले. या आगीमध्ये प्लास्टिक खुर्च्या, लोखंडी कपाटे, लाकडी कपाटे, पंखे, मिक्सर, सोफासेट इत्यादी जवळजवळ 15 लाख रुपयांच्या वस्तूंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आगीचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कदाचित एखादा पेटता फटाका इमारतीमध्ये उडाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आगीचे वृत्त समजताच शेकडो नागरिक घटनास्थळी आले आणि त्यांनी केलेली मदत आणि श्रीवर्धन नगर परिषदेचे आग विझविण्याचे बंब यांनी पहाटे सुमारे 3 ते 3.30 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. या इमारतीमध्ये श्‍वेता पोलेकर या आर.टी.ओ.शी संबंधित कामे, पोस्टातील गुंतवणुकीची कामे इ.करतात. तर मनोहर इलेक्ट्रॉनिक्स यांच्या तेथे ठेवलेल्या सुमारे चौदा-पंधरा लाख रु. च्या फर्निचरचे नुकसान झाले असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पोलेकर यांचे काही नुकसान झाले नाही. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता या घटनेसंदर्भात कोणाचीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजले.

नगरपालिकेचा भोंगळ कारभार
यावेळी अग्निशमन यंत्रणाचा भोंगळ कारभार श्रीवर्धन मधील नागरिकांच्या समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या चाव्या एकीकडे तर बंब गाडी एकीकडे अशी अवस्था त्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीवर्धन नगरपालिकेच्या अग्नीशमन यंत्रणेजवळ संपर्क साधल्यानंतर बंब येण्यासाठी एक तासाचा विलंब झाल्याचा आरोप मनोहर इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकांकडून केला जात आहे. नगरपालिकेच्या मोठ्या बंबाची गाडी तसेच छोट्या बंबाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर काही क्षणातच दोन्ही बंब गाड्यांमधील पाणी संपल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचे देखील बोलले जात आहे. सदरचे बंब पाण्याने पुन्हा भरून आणल्यानंतर आग विझवण्यात आली. तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी ठिकठिकाणचे पाणी उपलब्ध करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर श्रीवर्धन शहरातील वीज पुरवठा कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून तातडीने खंडित करण्यात आला होता.

नपा विरोधात तक्रार
आग लागलेल्या इमारतीचे मालक वसंत गजानन यादव हे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. अग्निशमन विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सोमवारी ते जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी विराज लबडे हे आजारी असल्यामुळे रजेवर आहेत. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत श्रीवर्धन नगर परिषदेचा कारभार गाव खात्याचाच कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Exit mobile version