मुंबई इंडियन्सचा विराट पराभव

| बंगळुरु | वृत्तसंस्था |
विराट कोहली आणि ड्यु प्लेसिस या दोघांनीच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धुलाई करीत आरसीबीला मोठा विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 171 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोहली आणि फॅफ मैदानात उतरले व चौफेर फटकेबाजी करत त्यांनी संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. फॅफने यावेळी 43 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 73 धावांची खेळी साकारली. कोहलीने यावेळी 49 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची खेळी साकारली.

कोहली आणि प्लेसिस हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांचा खेळ पहिल्याच सामन्यात चांगलाच बहरल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीपासून या दोघांनी आपल्यामध्ये चांगला समन्वय ठेवला. या दोघांनी सुरुवात संयतपणे केली. पण एकदा सेट झाल्यावर मात्र या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली आणि मुंबईच्या संघाला संपूर्ण मैदानाची सैर केली. कोहलीपेक्षा फॅफ हा जास्त आक्रमकपणे खेळत होता. त्यामुळे त्याचे अर्धशतक हे लवकर झाले, पण कोहली पण मागे राहणारा नव्हता. कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकांनंतर या दोघांनीही अधिक आक्रमकपणे फलंदाजी केली.

मुंबई इंडियन्सला या सामन्यात सुरुवातीपासून धक्के बसायला सुरुवात झाली होती. इशान किशन हा मुंबईचा पहिला बाद होणारा खेळाडू ठरला. रोहित शर्माला यावेळी दोन जीवदानं मिळाली, पण या दोन्ही गोष्टींचा चांगला फायदा घेता आला नाही. रोहित यावेळी फक्त एक धाव करून तंबूत परतला. सूर्यकुमार यादवलाही यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. सूर्या यावेळी 15 धावा करून तंबूत परतला. मुंबईचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. पण त्यावेळी मुंबईसाठी धावून आला तो तिलक वर्मा. मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, कॅमेरून ग्रीन हे नावाजलेले खेळाडू झटपट बाद झाले. पण तिलकने या सामन्यात 46 चेंडूंत 9 चौकार व सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 84 धावांची खेळी साकारली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

Exit mobile version