भूसंपादन यंत्रणेचा कानाडोळा
। पेण । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा वर संपादन केलेल्या जागेंपैकी अनेक ठिकाण खुलेआम अतिक्रमण सुरू झाले आहेत. पळस्पे ते वडखळ च्या दरम्यान तर या अतिक्रमणाने हद्द केलेली आहे. रस्त्यासाठी संपादन केलेल्या जागेत नव्याने बांधकाम झालेले आहेत. मात्र अधिकारी वर्ग या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शऩास येत आहे.
महामार्गावर नव्याने चाललेल्या बांधकामा संदर्भात पेण पत्रकार संघटनेकडून डिसेंबर 2020 मध्ये लेखी तक्रार भू संपादन अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावेळी प्रांतांनी तातडीची बैठक लावून नव्याने बांधकाम होणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काही प्रमाणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणार्या अतिक्रमणांना खिळ बसली होती. परंतु पुन्हा एकदा एक वर्षानंतर राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम अतिक्रमण व्हायला सुरूवात झाली आहे. म्हाडा कॉलनी समोरील पक्षु संवर्धन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठया प्रमाणात मातीचा भराव टाकून त्या ठिकाणी लोखंडी फॅब्रिकेशन चे काम सुरू असून गाळे पाडले जात आहेत. या बाबत सविस्तर माहिती घेतली असता सदरची जमीन ही पशसंवर्धन खात्याच्या नावेच 7/12 वर होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या भू संपादनाच्या वेळी सदरची जागा ही राष्ट्रीय महामार्गाने संपादीत केली. मात्र आता या जागेवर मोठया प्रमाणात बांधकाम सुरू आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी फेगडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सदरील प्रकार काय आहे ते मी तलाठयाला पाठवून पाहून घेतो आणि जर राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत अतिक्रमण केले असेल तर त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल. – विठ्ठल इनामदार,भू संपादन अधिकारी