महाड एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; दोघेजण जखमी

। महाड | प्रतिनिधी ।

महाड एमआयडीसी परिसरात रविवारी (दि.27) रात्री साडे दहाच्या सुमारास एक भीषण औद्योगिक अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एमआयडीसीतील सिनर्जीया केम इंडस्ट्रीज कंपनीमध्ये केमिकल टँकचा अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, कंपनीतील लोखंडी तसेच सिमेंटचे स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले असून काही भाग हवेत उडाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे परिसरातील अन्य कारखान्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

स्फोटाचा आवाज आणि हादरे महाड एमआयडीसी परिसरासह आसपासच्या गावांपर्यंत जाणवले. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर कंपनी परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दोन कामगार जखमी
या भीषण स्फोटात कंपनीतील दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये शेलटोली गावचे रहिवासी बिपिन लाड हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. दुसऱ्या जखमी कामगारावरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
स्फोटानंतर परिसरात गॅस गळती झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, घटनास्थळी कोणत्याही प्रकारची वायू अथवा गॅस गळती झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
केमिकल टँकचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करून स्फोटामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. कंपनीतील सुरक्षा व्यवस्था, टँकची स्थिती आणि अन्य तांत्रिक बाबींची तपासणी केल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Exit mobile version