| कर्जत | प्रतिनिधी |
नेरळ शहरातील कुंभार आळी परिसरात धारप हॉलसमोर असलेल्या विद्युत रोहित्रला शनिवारी (दि.26) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विद्युत कर्मचारी तसेच स्थानिकांनी प्रयत्न केले. तब्बल अर्धा ते एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.
नेरळ शहरातील कुंभार आळी परिसरात धारप हॉलसमोर असलेल्या विद्युत रोहित्रमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि धूर निघू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच सजग नागरिकांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क साधला. त्यानंतर विद्युत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत रोहित्राने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तब्बल अर्धा ते एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत विद्यूत रोहित्र पूर्णपणे जळून खाक झाला असून, परिसरातील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. ही घटना घडून 15 तास लोटले तरी नवीन विद्यूत रोहित्र बसवून झाले नव्हते. त्यामुळे नेरळ गावातील अर्ध्याहून अधिक भागातील वीज पुरवठा बंद राहिला. त्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास विद्यूत रोहित्र बदलण्यात आले आणि त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला. तसेच, या ठिकाणी आतापर्यंत एकूण चार ट्रान्सफॉर्मर आगीच्या विळख्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. परिसरात अनेक इमारती आणि नागरिकांची वर्दळ असतानाही आग आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरली नाही तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेरळमधील विद्युत रोहित्रला भीषण आग
