| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील मंगलम कंपनीत मध्य रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथील मंगलम कंपनीत काल रात्री भीषण आग लागली, ज्यामुळे युनिटचे मोठे नुकसान झाले. कापूर बनवणाऱ्या या कंपनीत अत्यंत ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग वेगाने पसरत असल्याचे दिसून आले. खालापूर चे तहसीलदार अभय चव्हाण यांनी तात्काळ परिसरातील अग्निशमनदलाला कळविले. खोपोली नगरपरिषद, रसायनी एमआयडीसी, टाटा स्टील, AM/NS, आलाना ऑइल, रिलायन्स, खोपोली फायर ब्रिगेडसह खालापूर पोलीस, हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी अडीच तास अथक परिश्रम घेतले. खालापूर तालुक्यातील सावरोली रोडवरील इसंबा फाटा ते खारपाडा कडे जाणाऱ्या मार्गांवर कुंभवली ग्रामपंचायत मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लगत ही कंपनी आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नसून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






