| बोईसर | प्रतिनिधी |
बोईसर पश्चिम भागात गोडाऊनला मंगळवारी (दि. 23) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बोईसर रेल्वे स्थानक जवळील या गोडाऊन मध्ये औद्योगिक कचरा साठवनुक केल्याचे दिसून येते. बोईसर पश्चिम वंजारवाडा फाटक ते दांडी पाडा रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत घनकचरा व भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे. दरम्यान गोडाऊनला अचानक आग धुराचे लोट उठू लागले आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. सर्वत्र धुराचे लोट उसळले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे येथील परिसरातील नागरिकांची एकच धावपळ झाली. आगीने वेग पकडल्यामुळे प्लास्टिक, रद्दी तसेच गोडाऊन मधील इतर साहित्य पेटले. आग आटोक्याच्या बाहेर जाऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अवैधरित्या घनकचऱ्याचा व भंगाराचा साठा केल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे जीवित व मालमत्तेचा मोठा धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने तातडीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






